किशोरांच्या आत्महत्या विषयी माहिती | Information about teen suicide in marathi

Share

किशोरांच्या आत्महत्या

किशोरावस्थेतील मुला-मुलींच्या बाबतीत आढळून येणारी सर्वात गंभीर समस्या म्हणजे किशोरांमध्ये आढळून येणारे आत्महत्येचे वाढते प्रमाण होय . प्रत्येक व्यक्तीस आपण खूप जगावे असे वाटते . वृद्ध व्यक्ती , आजारी माणसे , वेडी व विकृत माणसे अशा सर्वांनाच आपले जीवन किंवा आयुष्य अधिक प्रिय व मौल्यवान वाटत असते . तरीपण मनुष्य स्वेच्छेने आपल्या जीवनाचा अंत का करतो ? आपले जीवन का संपवतो ? आत्महत्येचे वाढते प्रमाण ही मानसशास्त्रज्ञ व समजशास्त्रज्ञानपूढे सध्याच्या काळातील अत्यंत गंभीर समस्या मानली जाते . विशेषत: किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळून येणारी आत्महत्येची अनेक उदाहरणे आपणास अत्यंत यातनादायक वाटतात .

आत्महत्या करण्यापूर्वी खूप काही घडलेले असते . किशोरवयीन मुलांच्या मनात तो विचार सतत घोळत असतो आणि मग एखाद्या दिवशी किरकोळ गोष्टीचे निमित्त साधून आत्महत्या केली जाते . आत्महत्या का केली जाते ? याविषयीची कारणमीमांसा मानसशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी केलेली आहे . आत्महत्या ही एक सामाजिक घटना आहे . आत्महत्येची कारणे सामाजिक , भावनिक , मानसिक , आर्थिक , कौटुंबिक व व्यक्तिगत अधिक आढळून येत असते .

white and black concrete building

सर्वसाधारणपणे बाल्यावस्थेमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी असते . पण वय वाढत जाईल तसे ते प्रमाण वाढते . किशोरावस्थेमध्ये व तारुण्यावस्थेमध्ये ते अधिकच वाढते . वय वर्षे 10 ते 19 यादरम्यानच्या किशोरांचे जे मृत्यू होतात . त्यातील सर्वाधिक मृत्यू हे आत्महत्येमुळेच होतात . आत्महत्या हे या काळातील मृत्यूचे क्रमांक 3 चे कारण आहे असे आढळून येते . ‘ मी आत्महत्या करेन ‘ किंवा मी स्वत: च्या जीवाचे बरे -वाईट करून घेईन ‘ अशी जी धमकी किशोरवयीन मुलांकडून दिली जाते ती खरे तर गांभीर्याने घेतले पाहिजे . या बाबतीत करण्यात आलेल्या एका अभ्यासामुळे हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या 17 % मुलांनी आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याचे आढळून आहे . स्वत:ला जखमी करून घेणे , विष पिणे , झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेणे व कीटकनाशक पिणे अशा अनेक मार्गांनी आत्महत्येचा प्रयत्न केला जातो .

वॅन या संशोधकाच्या मते , आत्महत्या ही कधी अचानक किंवा एकाएकी व सहज केली जात नाही खूप दिवस किंवा खूप काळ अगोदरपासून काही कारणे मनामध्ये रेंगाळत असतात . त्या दिशेने किशोरांचा विचार चालू झालेला असतो . मात्र ताण असह्य झाल्यामुळे प्रत्यक्षात तसे पाऊल उचलले जाते . कौटुंबिक अस्वस्थ , पालकांमधील भांडण तंटे , विसंवाद , आर्थिक विवंचना , असुखद कौटुंबिक वातावरण , भावनिक आधार नसणे , प्रचंड ताण , प्रेमभंग , अनावश्यक बंधने इत्यादी घटकांच्या दीर्घकाळ प्रभावामुळे मुले आत्महत्येकडे वळतात . शिवाय जर समवयस्क मित्रमंडळींपैकी कोणी एखाद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचा परिणाम अन्य मित्रांवर होतो . मित्रांचा आधार नसेल तरीही आत्महत्येचे विचार मनामध्ये येऊन जातात . सांस्कृतिक वतावरणाचाही यावर प्रभाव पडतो . कौटुंबिक ताणतणाव व मद्यपानाचे वाढलेले प्रमाण हे मुख्य कारण आत्महत्या करण्यामागे आढळते . अनुवंशिक घटकांमुळेही आत्महत्या केली जाते . पाठीमागील पिढीतील जर कोणी एखाद्याने आत्महत्या केलेली असेल तर पुढील पिढीमध्येही कोणीतरी आत्महत्या करण्याची शक्यता असते . प्रचंड ताण , नैराश्य आणि मद्यपान या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून आत्महत्येचे पाऊल उचलले जाते .

आत्महत्या करण्यामागे महत्वाची खालील कारणे :

  • कुटुंबातील इतर सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असणे किंवा आत्महत्या केलेली असणे .
  • पूर्वी आत्महत्येचा केलेला प्रयत्न किंवा मनोचिकित्सक उपचार
  • आयुष्यातील तणावपूर्वक घटना
  • औषधी द्रव्ये किंवा मद्यपान
  • शारीरिक आजारपण किंवा गंभीर रोग
  • परावलंबित्व , असमर्थता आणि व्यर्थपणाची भावना
  • इतरांची मदत घेऊ न शकणे
  • निकृष्ट समस्या – परिहार क्षमता
  • इतरांशी मैत्रीचे व्यक्तिगत संबंध ठेवण्यात अडचणी येणे .

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये असलेले आत्महत्येचे प्रमाण एकंदर आत्महत्येच्या आकडेवारीत सर्वांत जास्त असते . प्रेमभंग , परीक्षेतील अपयश , प्रिय व्यक्तीशी लग्न करण्याचा घरच्यांचा विरोध , कौटुंबिक संघर्ष , बेकारी व मनाविरुद्ध घटना इत्यादी कारणांमुळे किशोरावस्थेतील मुला-मुलींमध्ये आत्महत्या आढळून येतात . याशिवाय सतत ताणतणावास तोंड द्यावे लागणे , पालकांशी संघर्ष , आौषधी द्रव्य व व्यसनाधीनता तसेच दुरदर्शनवरील हिंसाचाराचे व आत्महत्येचे प्रदर्शन यामुळे किशोरवयीन मुलामुलींमध्ये आत्महत्या जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे . याउलट प्रौढ व वयस्कर व्यक्तींमध्ये आढळून येणाऱ्या आत्महत्येची कारणे वेगळी असू शकतात .


Share

Leave a comment